हे बरं की ते बरं?

साता समुद्रा पलीकडे समृध्दी ची आशा

परका देश, परके लोक, परकी भाषा

कष्टाचं फळ मिळण्याची माफक अपेक्षा

पण इतका त्याग, इतके त्रास, तर हे बरं की ते बरं?


इकडे कंटाळा येण्या इतका चार महिने पाऊस

तिकडे चार दिवसात फिटली बर्फाची हौस

इथे चोहीकडे गर्दी, तिथे औषधाला नाही माणूस

काही सोपं काही अवघड, हे बरं की ते बरं?


दारात कढीपत्त्याचं झाड, कधीही तोडा

की सोन्याच्या भावात मिळालेला थोडा?

खर्च करा नाहीतर चवी वर पाणी सोडा

जिभेचे किती लाड? हे बरं की ते बरं?


पंखाच्या छायेत कायम रहायचं नसतं

घरट्यातून उडलं तरच जग दिसतं

पण हे प्रत्येकाने आपलच ठरवायचं असतं

कारण कधी हे बरं तर कधी ते बरं!