महागासुर
महागाईच्या केळीच्या सालीवर घसरून धाडकन पडलो
अर्ली रिटायरमेंट चे स्वप्न बघत नोकरीतच रखडलो
दहा रुपयाची राइस प्लेट कधीच भूतकाळात गेली
आता तेवढ्या पैशात पाव किलो भाजी ही मिळेनाशी झाली
चांगल्या चाकरीचा चुकून बोनस मिळाला यंदा
आनंदात घरी नेला चक्क एक किलो कांदा
मित्रांनी पण जरा घाबरतच पार्टी मागितली
मग बायकोने अनेक महिन्याने तुरीची आमटी केली
आमचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च जेवढ्यात झाला
तेवढी रक्कम तर पर्वा शाळेचा रिक्षावाला घेऊन गेला
न पिणाऱ्या मित्राने देखील काल दारू विकत घेतली
पेट्रोल पेक्षा स्वस्त म्हणून स्कूटर च्या टाकीत ओतली
हल्ली तर आजारी पडायची सुद्धा भितीच वाटते
कारण पगारापेक्षा हॉस्पिटल चे बिल जास्त साठते
गरीबीच्या गुढग्यांना मिळाली पेन्शन ची काठी
निवृत्तीच्या दारात पोचलो अचानक उगवली साठी
आता महागाईच्या समुद्रात झकत तरावं लागेल
नाहीतर परवडत नाही म्हणून लवकर मरावं लागेल