Poetry‎ > ‎

कळलं नाही मला

छत्रीचा ओघळ शर्टात कधी गेला कळलं नाही मला 

चष्मा ते चप्पल केव्हा भिजलो कळलं नाही मला

 

तीन गाड्या अशाच सोडल्या कारण माणसांमध्ये डबाच दिसेना 

तासानंतर जेव्हा चौथी आली ती सहजा सहजी सोडवेना


एक पाय फुटबोर्ड वरती दुसरा शेजाऱ्याच्या बुटावर चेपला

पलिकडच्याने कोपर पोटात रेटलं बिचारा ओरडू ही नाही शकला

 

मुलुंड गेलं गर्दी वाढली नाहूर वाले ढकलू लागले 

अधांतरी अवस्थेत पिशव्या धरून 'उतरून चढा' बोंबलू लागले

 

इंच इंच लढवीत कोपरा जिंकला दुपारी तरी ऑफिस गाठायचं होतं 

अवयव वाकडे वक्र करून मला ही पुढे उतरायचं होतं

 

गाडी कशी थांबली, बाहेर कसा पडलो कळलं नाही मला 

शर्टाबरोबर मी ही कधी चुरगळलो कळलं नाही मला